इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क
Gram Sevak attendance will now be done through biometric system
चंद्रपूर, दिनांक. २९ :- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ नुसार विविध गावातील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे काम पाहत असतात सदर पदावर कार्यरत असतांना त्यांनी करावयाच्या कामांची कर्तव्यसूची ग्राम विकास विभागाद्वारे अधिसूचित आहे.
ग्रामसेवकांना ग्रामपंचातीमधील सर्व प्रकारचे अभिलेख जतन करून वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्ययावत ठेवाव्या लागतात तसेच पंचायतीने ठरवून दिल्याप्रमाणे ग्रामसभा, मासिक सभा आयोजित करून सभेचा कार्यवृत्तांत लिहिणे व सभेमध्ये झालेल्या निर्णयाची गाव पातळीवर अंमलबजावणी करणे बंधनकरारक आहे.
मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे शासनाने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहत नाही त्यामुळे नागरिकांना करावयाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. अश्या अनेक तक्रारी शासणाला प्राप्त झाल्या त्यामुळे शासनाद्वारे याबाबीला आळा बसविण्याकरिता ग्रामसेवकांची हजेरी जीपिएस आणि बायोमॅट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत विचाराधीन होती.
अंतिमतः ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन उप सचिव यांनी दि. १० डिसेंबर २०२४ रोजी आदेश काढून त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मार्फत ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये तात्काळ जीपिएस आणि बायोमॅट्रिक मशीन बसवून ग्रामसेवकांच्या हजेरींची नोंद घेण्याचे निर्देशित केलेले आहे.
त्यामुळे आता ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांना शासनाने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये ग्रामपंचायतीत उपस्थित राहावे लागणार आहे.