Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यात 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान कुष्ठरोग शोध अभियान

चंद्रपूर जिल्ह्यात 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान कुष्ठरोग शोध अभियान

प्रतिनिधी / चंद्रपूर, दि. 04 : Leprosy detection campaign : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत दि. 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे समाजात लपून राहिलेले कुष्ठरोग लवकरात लवकर व विनाविकृती शोधून काढत त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे, तसेच नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करून होणारा प्रसार कमी करणे, व समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, तसेच 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे हा मोहिमेचा उद्देश आहे.

त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, चंद्रपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.ललीत पटले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे आदी उपस्थित होते.

कुष्ठरोगाची लक्षणे : त्वचेवर फिकट/ लालसर बधीर चट्टा त्या ठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट/ चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे. भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पुर्ण बंद करता न येणे, तळहात व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे ही लक्षणे आहे.

Leprosy detection campaign

जिल्ह्यामध्ये 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची कुष्ठरोग विषयक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तदनंतर संशयित कुष्ठ रुग्णांची तपासणी करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत निदान करण्यात येणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील एकूण लोकसंख्या 18 लक्ष 12 हजार 994, तर एकूण घरे 4 लक्ष 41 हजार 362 करिता ग्रामीण व शहरी भागातील एकूण 1537 टीम असणार आहे. सदर कार्यक्रम जनतेच्या हिताचा असून यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी जाऊन आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे. तरी, सर्व जनतेने येणाऱ्या कर्मचाऱ्यामार्फत आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
००००००

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments