Industrial Investment Assistance Committee constituted under the chairmanship of District Magistrate
इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 03 : औद्योगिक धोरण राबविताना 100 दिवसांचा कृती आराखड्यामधील गुंतवणूकीस प्रोत्साहन (Investment Promotion) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्ह्यात विविध ठिकाणांवरून येणाऱ्या गुंतवणूकदार उद्योजकांना प्रात्सोहन मिळावे, उद्योग उभारण्याकरीता पोषक वातावरण निर्माण व्हावे, जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक होवून औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मिती होण्याकरीता जमिनीचा वापर सुलभ करण्यासाठी उद्योजकास आवश्यक विविध विभागांकडील अधिकृत माहिती एकखिडकी योजनेनुसार एकत्रित उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक गुंतवणूक सहाय्यभूत समिती (Industrial Investment Facilitation Committee) गठीत करण्यात आली आहे.

समितीमध्ये संबंधित विभागांचे अधिकाऱ्यांची सदस्य तर निवासी उपजिल्हाधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गुंतवणूकदार/उद्योजकांना आणि व्यापारी वर्गाच्या संघटनांशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांची चंद्रपूर जिल्ह्याकरीता नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.

जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक होवून औद्योगिक विकास व रोजगार निर्मिती होण्याकरीता औद्योगिक प्रयोजनात जमिनीचा वापर सुलभ करण्यासाठी तसेच विविध विभागांकडील आवश्यक माहिती उपलब्ध करून घेण्याकरीता उद्योजकांनी औद्योगिक गुंतवणूक सहाय्यभूत समितीकडे निश्चित कार्यपध्दतीनुसार अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.
००००००
