प्रतिनिधी / अमरावती, दि. 6 : उपक्रमशिल शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात प्रदिर्घ सेवा देणाऱ्यांकडून नाविण्यपूर्ण सूचना प्राप्त होत आहेत. प्रामुख्याने शासकीय शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी आलेल्या सूचनांची राज्यव्यापी अंमलबजावणी जाणीवपूर्वक करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

अमरावती जिल्हा नियोजन भवनात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा आढावा आणि उपक्रमशिल शिक्षकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटिवार, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक निलिमा टाके आदी उपस्थित होते.

श्री. भुसे यांनी, विद्यादानाचे कार्य करणारे शिक्षण हे मानबिंदू आहेत. असंख्य अडचणी आणि समस्यांचा सामना करीत शिक्षक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबतही समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना येणारे छोटे प्रश्न येत्या काळात सुटलेले असतील. शिक्षक, संस्थाचालक यांच्या अडचणींची नोंद घेण्यात आली आहे. याबाबत येत्या काळात निर्णय घेण्यात येतील.

शाळा भेटीतून स्वच्छता, पोषण आहार आदीबाबत कार्यवाही व्हावी, अनूचित प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासोबतच शिक्षकांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. याची दखल घेऊन चांगले कार्य करणाऱ्यांचे कौतुक करण्यात येईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला समोर जाताना टप्याने सीबीएसईमध्येही शिक्षण देण्यात येणार आहे. यासोबतच स्थानिक विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शैक्षणिक सुधारणा करताना लोकसहभाग महत्वाचा आहे. यातून शैक्षणिक समस्यांसह विद्यार्थ्यांचे आरोग्याचे प्रश्नही मार्गी लावण्यात यावेत.

जिल्हा नियोजनमधून शालेय शिक्षणासाठी तीन टक्के निधी राखीव आहे. यातून शाळा दुरूस्ती, नवीन वर्गखोल्या बांधकाम हाती घेण्यात यावे. यावर्षीपासून शाळांच्या संरक्षण भिंती बांधण्याचे काम रोहयोमधून करण्यात येणार आहे. तसेच शाळांनी जलजीवन मिशनमधून पिण्याच्या पाण्याची सोय करावी. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
0000000