इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क
पत्रकार / चंद्रपूर, दि. १४ : शरद पवार ग्राम समृद्धी योजनेंतर्गत राज्य सरकारद्वारे गाय-म्हैस पालनासाठी विशेष अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होण्यास हातभार लागणार आहे.
ग्रामीण भागात जनावरांच्या गोठ्यांची जागा ओबडधोबड व खाचखळग्यांनी भरलेली असते. हे गोठे क्वचितच व्यवस्थित बांधले जातात. गोठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांचे शेण व मूत्र पडलेले असते. पावसाळ्यात गोठ्यातील जमिनीस दलदलीचे स्वरूप प्राप्त होते. या जागेतच जनावरे बसत असल्याने ती आजारांना बळी पडतात, काही जनावरांना स्तनदाह होऊन उपचारांसाठी हजारो रुपये खर्च होतात. जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणी नसतात. त्यामुळे जनावरांना चारा व खाद्य देण्यासाठी गव्हाण बांधणे आवश्यक आहे. सिमेंटचा गोठा बांधल्यास जनावरांचे चांगले संगोपन होऊ शकते.
योजनेचे फायदे काय ?
१ आधुनिक पद्धतीने गोठा बांधल्यामुळे पशुधनाचे आरोग्य चांगले राहते. दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
२ पशुधनाची निगा राखणे सोपे होईल. गोठा बांधकामासाठी मोठी रक्कम स्वतः खर्च करावी लागणार नाही.
3 अनुदानामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होईल.
अनुदान किती ?
दोन ते सहा जनावरांचा गोठा : दोन ते सहा जनावरांच्या गोठा बांधकामासाठी एकूण ७७हजार १८८ रुपये अनुदान शासनाकडून वितरित केले जाते.
सहा ते बारा जनावरांचा गोठा : सहा ते बारा जनावरांच्या गोठ्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाते. म्हणजेच १ लाख ५४ हजार ३७६ रुपये दिले जातात.
तेरापेक्षा अधिक जनावरांसाठी: तेरापेक्षा अधिक जनावरे असतील, तर पहिल्या प्रकाराच्या तीन पट म्हणजेच २ लाख ३१ हजार ५६४ रुपयांचे अनुदान दिले जाते.
कोणाला अर्ज करता येणार?
अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. याशिवाय पशुधन पाळता येण्याचा अनुभव असावा.