अमरावती, दि. 09 (जिमाका) : अनूसुचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी 45 दिवसांचे नि:शुल्क निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यासाठी इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उद्योग संचालनालय, जिल्हा उद्योग केंद्र, मैत्री कक्ष, आणि महराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती विशेष प्रोत्साहन योजनेंतर्गत सदर प्रशिक्षण दि. 17 मार्च ते 3 मे 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. यात कृषीमाल प्रक्रिया, डाळ मिल, मिनी आईल मिल, मसाला उद्योग, इन्स्टंट रेडीमिक्स, मशरूम, भाजीपाला निर्जलीकरण, फळांपासून विविध उत्पादन, उद्योजकीय गुण, व्यक्तीमत्व विकास, उद्योगासंबंधात मार्गदर्शन, मार्केटिंग, बँकेची सबसिडी, योजनांची माहिती, उद्योजकीय अडचणीचे निष्कारण, परवाना, उद्योग व्यवस्थापन या विषयाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी उमेदवार 18 ते 50 या वयोगटातील असावा. उमेदवाराची निवड प्रत्यक्ष मुलखातीद्वारे करण्यात येणार आहे. परिचय मेळावा व मुलाखतीला येताना मूळ कागदपत्रे, त्यांची छायांकित प्रत, यात शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, 3 फोटो, सोबत आणावे. दि. 11 मार्च रोजी 12 ते 3 वाजेदरम्यान एक दिवसीय परिचय मेळावा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात घेण्यात येणार आहे. तसेच मुलाखती घेण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणासाठी दि. 4 मार्च ते दि. 13 मार्चपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी स्वप्नील इसळ, कार्यक्रम आयोजक, संपर्क क्रमांक 8788604226, राजेश सुने संपर्क क्रमांक 7507747097 प्रकल्प अधिकारी, तसेच जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पहिला माळा, टांक चेम्बर्स बिल्डींग, गाडगेनगर, व्हीएमव्ही रोड, अमरावती येथे संपर्क साधावा,
असे आवाहन विभागीय अधिकारी किशोर अंभोरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी केले आहे.