वन कर्मचारी, अधिकारी, स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
सुरेश रंगारी (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)
पत्रकार / कोठारी, दि. ०५ : कोठारी वनपरिक्षेत्रात १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. वन्यजीव संवर्धन आणि संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग लाभला.
सप्ताहभर विविध प्रदर्शन, देखावे, रॅली, व्याख्याने आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. वन्यजीवांचे संरक्षण, पर्यावरण संतुलन आणि जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणारे अनेक देखावे स्थानिक शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी साकारले.

कोठारी क्षेत्राचे वन अधिकारी सुरेखा मुरकुटे यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना “वन्यजीव हे निसर्गचक्राचा अविभाज्य भाग असून त्यांचे संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” नागरिकांनी वन्यजीवांच्या रक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात वन्यजीवांवर आधारित माहितीपटांचे सादरीकरण, वनभेटी, आणि संवाद सत्र आयोजित करून नागरिकांना जंगलातील जीवनशैली, वन्यजीवांचे महत्त्व व त्यांच्यासमोरील संकटांबाबत जागरूक केले गेले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षेत्र सहाय्यक धर्मेंद्र राऊत,परसोडी क्षेत्र सहाय्यक गणेश जाधव, करंजी क्षेत्र सहाय्यक पिल्लारे,वनरक्षक सिद्धार्थ कांबळे व कोठारी वनपरिक्षेत्र कर्मचारी आणि वनमजुर,रोजनदारी मजूर यांनी परिश्रम घेतले.
