सुरेश रंगारी (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)
पत्रकार / कोठारी, दि. 04 :बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दररोज शाळेत येताना-जाताना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. शाळेत साचलेल्या चिखलातून पायवाट काढत मुलांना वर्गापर्यंत पोहोचावे लागत आहे.तसेच साचलेले चिखल मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.
पावसाळ्याच्या काळात शाळेच्या प्रांगणात साचणारे पाणी आणि निचरा व्यवस्थेच्या अभावामुळे संपूर्ण शाळा परिसर चिखलमय झाला आहे.परिणामी, विद्यार्थ्यांचे चपलेत,बुटात चिखल भरतो,कपडे खराब होतात तर कधी तोल जाऊन घसरून पडण्याचे प्रसंगही घडतात. हे दृष्य पाहूनही स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्याकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत,हे दुर्दैवी आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी,अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही संतापाची भावना आहे.शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा अडचणींमुळे शाळेपासून मुकावे लागत आहे, हे चित्र शिक्षण व्यवस्थेसाठी लाजिरवाणं आहे.शाळेच्या प्रांगणात तत्काळ मुरुमाचा भरणा करावा तसेच पावसाचे पाणी प्रांगणाबाहेर जाण्यासाठी योग्य ती व्यवस्था करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी पालक आणि ग्रामस्थाची मागणी आहे.मात्र या प्रश्नाकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही,तर ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था आणखी ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.