प्रतिनिधी / चंद्रपूर ,दि.६ फेब्रुवारी (जिमाका) :राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन हे ‘कुटुंबाचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ विषयावर राष्ट्रीय स्तरावरील पाहणीत सहभागी होत आहे. या सर्वेक्षणासाठी डिसेंबर 2025 पर्यंत माहिती संकलित केली जाणार आहे. सर्वेक्षण राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविले जाणार असून यामध्ये पुढील माहिती संकलित केली जाईल.

सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय व खाजगी रुग्णालय, दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशिल इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे.

सर्वेक्षणांतर्गत कुटुंबांची निवड एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मुल असणारे कुटुंब’ आणि मागील 365 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती यामधून करण्यात येणार आहे. सर्वक्षणाच्या निष्कर्षाचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी येणार आहे.

कुटुंबांकडून सदर सर्वेक्षणाची माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी, (सांख्यिकी सहायक व अन्वेषक संवर्गातील) फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निवडक गावे व शहरी भागातील निवडक भागातील निवडक कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन आरोग्यविषयक माहीती गोळा करतील.

या सर्वेक्षणाकरिता घरी येणाऱ्या उपरोक्त अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या कुटुंबाची आरोग्य विषयक माहिती, रुग्णालयात भरती असतांना आजारपणावर झालेल्या खर्चाबाबतची योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी जिल्हयातील सर्व संबंधित कुटुंबीयांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.

राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे, यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
000000
