संदीप मावलीकर (संपादक / इंडियन दस्तक न्यूज)
पत्रकार / मुंबई, दि. ०७: देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. बी. आर. गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी चालू असतांना एका मनुवादी विचारसरणीच्या वकिलाने पायातील बूट काढून सरन्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न करण्याची घटना अत्यंत संतापजनक आहे.
राकेश किशोर या मनुवादी कट्टर सनातन्यानी केलेला हा प्रकार थेट भारताच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे. या घृणास्पद कृत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो! असे कॉग्रेस चे माजी प्रदेश अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी विधान केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला हजारो वर्षांच्या मनुवादी, वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेतून मुक्त केले. पण विषमतावादी, मनुवादी विचारांनी ग्रासलेल्या प्रवृत्ती अजूनही भारतात आहेत आणि आज त्याच प्रवृत्तीने थेट देशाच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला केला आहे.
आज एक दलित सरन्यायाधीश देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर विराजमान आहेत, ही गोष्ट मनुवादी लोकांना पटत नाही, कारण त्यांना न्यायव्यवस्थेत, प्रशासनात, किंवा सत्ताकेंद्रात दलितांचे अस्तित्व सहन होत नाही. या संतापाच्या मुळाशी द्वेष नाही, तर दलितांच्या प्रगतीबद्दल असलेली असहिष्णुता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीविरुद्ध अशा प्रकारची घटना झाल्यामुळे न्यायपालिकांच्या सुरक्षिततेवर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाही विरोधी, जातीयवादी राकेश किशोर या वकिलावर केंद्र सरकारने तत्काळ कारवाई करून अटक करावी आणि कठोरात कठोर शिक्षा द्यावी. अशी मागणी समाज माध्यमांद्वारे आ. नानाभाऊ पटोले यांनी केली आहे.
