‘आनंदवन’ हे मानवतेचे केंद्र ! 2027 पर्यंत कुष्ठरोगमुक्त भारताचा संकल्प…
इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / वरोरा, दि. १० : (CMOMaharashtra) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल दि. ०९/०२/२०२५ वरोरा, चंद्रपूर येथे ‘महारोगी सेवा समिती’चा 75 वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळावा पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

याप्रसंगी ‘बाबा आमटे’ या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचे डिजिटल अनावरण करण्यात आले. तसेच आनंदवन हेल्थ कॅपिटल कार्यक्रमांतर्गत भविष्यातील नियोजित मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या महिला व्यापक आरोग्य सेवा विभागाचे आणि अवयव दान विभागाचे डिजिटल लोकार्पण करण्यात आले.

यासोबतच, डब्ल्यूसीएलकडून देण्यात आलेल्या सोलर पावर जनरेशन प्रोजेक्टचे, श्रमतीर्थ सोमनाथ इन्स्टिट्यूट फॉर पीपल, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला आणि मुलींसाठी उपजीविका व कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.

आनंदवन हे मानवतेचे मंदिर आहे. मानवी संवेदनाची व्याख्या बाबा आमटे यांच्या कार्यातून आपल्याला पाहायला मिळते. समाजात कुष्ठरोगाबद्दल तिरस्काराची भावना असताना त्यांनी या कार्याची सुरुवात केली. विशेष म्हणजे, 75 वर्षांनंतर समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती येथे येतात आणि या प्रकल्पाशी जोडल्याने त्यांना आत्मिक समाधान मिळते. ही 75 वर्षांची वाटचाल खरोखरच महत्त्वाची आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

चंद्रपूर-गडचिरोली हा आदिवासी बहुल आणि मागासलेला भाग असताना बाबा आमटे यांनी हा प्रकल्प हातात घेतला. आमटे कुटुंबीयांनी आनंदवन, सोमनाथ आणि हेमलकसा या प्रकल्पांचा विस्तार केला. केवळ कुष्ठरोगीयांची सेवा नव्हे तर शैक्षणिक, आरोग्य, जलसंधारण, पर्यावरण रक्षण यांसारख्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक प्रयोग हाती घेतले आहेत, ज्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडविले जात आहे. आमटे कुटुंबीयांनी आपले संपूर्ण जीवन या प्रकल्पासाठी समर्पित केल्याचे, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विशेष नमूद केले.

बाबा आमटे यांनी विविध प्रकल्पांसोबत आणि उपक्रमांच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशात एक संवेदना निर्माण केली आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. अनेक अडचणींचा सामना करत हा प्रकल्प पुढे जात असला, तरी आनंदवनचे कार्य अविरत सुरू आहे. कला, संगीत, चित्रपट, उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर या संस्थेशी जोडले गेले आहेत.

2012 पासून आनंदवनला मिळणाऱ्या अनुदानात बदल करत प्रति रुग्ण ₹2,200 ऐवजी आता ₹6,000 देण्यात येईल. तसेच, पुनर्वसन अनुदान ₹2,000 वरून ₹6,000 प्रति रुग्ण करण्यात येईल. आनंदवनला त्वरित ₹10 कोटींचा कॉर्पस फंड देण्यात येईल आणि उर्वरित ₹65 कोटी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
