इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क
मुंबई, दि.२३ : विविध नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना किमान पाच वर्षे काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभमिळणार नाही.
खरीप हंगाम योजनेतील पिकांमध्ये भात, सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ आदी पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येणार आहे. या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत आपला सहभाग नोंदवू शकतात. ई-पीक पाहणी व विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल व विमा हप्ता जप्त करण्यात येणार आहे.
काळ्या यादीत येणार नाव
अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्षे काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.

बोगस अर्ज भरल्यास होणार कठोर कारवाई
बोगस पीकविमा काढणाऱ्या संबंधित शेतकऱ्याला पाच वर्षापर्यंत कुठल्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तसेच बोगस अर्ज भराल तर आधार नंबर काळ्या यादीत समाविष्ट केले जाणार आहे.
विमा भरण्यासाठी प्रतिशेतकरी मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहेत. ते संबंधित विमा कंपनीमार्फत दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क देऊ नये. काही शेतकरी खोटी कागदपत्रे तयार करून पीकविमा भरत असल्याची बाब समोर आली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
परवाना होणार रद्द
बोगस पीकविमा भरणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांसोबतच सर्व्हिस सेंटर चालकावरही कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बोगस विमा भरल्यास सर्व्हिस सेंटरचा परवाना रद्द करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय समितीला अधिकार देण्यात आलेले आहेत.