सुरेश रंगारी (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)
पत्रकार / कोठारी, दि. ०५ : कोठारी गावातील मुख्य रस्त्यालगत असलेले सुमारे शंभर वर्षांपेक्षा जुने पिंपळाचे झाड गेल्या काही महिन्यांपासून गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होते.झाडाच्या जुना वळकटलेला बुंधा व अर्धवट सुकलेल्या फांद्या रस्त्यावर वाकलेल्या अवस्थेत असल्याने त्याखालून जाणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अपघाताला आमंत्रण देत होते.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार करून याबाबत दखल घेण्याची मागणी केली होती. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना आणि वृद्ध नागरिकांना झाडाखालुन जाणे अत्यंत धोकादायक बनले होते. काही दिवसांपूर्वी जोरदार वाऱ्यामुळे झाडाची एक फांदी कोसळल्याने मुन्ना तोटावार थोडक्यात बचावला.यानंतर ग्रामस्थांचा रोष अधिकच वाढला.

ग्रामपंचायत कोठारीचे उपसरपंच सुनील फरकडे यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत, तातडीने झाड तोडण्याचा निर्णय घेतला.वनविभाग व स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती देऊन सहकार्य व मार्गदर्शन घेत झाड तोडण्याचे काम शनिवार दि.४ आक्टोबरला पार पाडण्यात आले.झाडाच्या तोडीवेळी सुरक्षिततेचे सर्व उपाय करण्यात आले,दोन्ही बाजूने शंभर मीटर पर्यंत रस्ता बंद करण्यात आला. जवळपासच्या वीजवाहिन्या,घरांचे संरक्षक उपायही करण्यात आले.
यामुळे गावकऱ्यांमध्ये आता दिलासा निर्माण झाला असून, भविष्यातील संभाव्य अपघात व जीवितहानी टळल्यामुळे गावकरी व व्यापारी संघटनेने ग्रामपंचायतीचे आभार मानले. या प्रकरणामुळे लोकसुरक्षेसाठी वेळेवर निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.शंभर वर्षापूर्वीचे पिंपळाचे झाड कापणे हा निर्णय सहज शक्य नाही. झाडाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन तोडताना सर्व विधीपूर्वक प्रक्रिया पार पाडण्यात आली.मात्र नागरिकांच्या संभाव्य सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत उपसरपंच सुनील फरकडे यांनी व्यक्त केले.
