कोठारीतील अतिक्रमणधारकांची अवस्था शासकीय योजनांपासून वंचित
सुरेश रंगारी (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)
पत्रकार / कोठारी, दि. ०४ :कोठारी येथील अतिक्रमणधारक मागील ४० वर्षापासून शासकीय अतिक्रमित जागेवर घरांचे बांधकाम करून वास्तव्याला आहेत. मात्र, घरांना अद्यापही स्थायी पट्टे मिळाले नाही. अतिक्रमणधारकांच्या घरांना स्थायी पट्टे देण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष घालून हक्क मिळवून देण्याची मागणी केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून वनविभाग व महसूल विभागाच्या जागेवर १०० ते १२५ झोपडीवजा घरे उभारून नागरिक कुटुंबासह वास्तव्यास अतिक्रमणधारक आहेत. ३०-४० वर्षांपासून राहत आहेत आणि तेथील जमिनीवर काहींनी स्वतःच्या पैशाने तसेच शासकीय घरकुल योजनेतून घरांचे बांधकाम केले आहे. वीज, पाणी, रस्ते, अंगणवाडी इमारत व नाली अशा सोयीसुविधा शासकीय निधीतून ग्रामपंचायतीने उभ्या केल्या आहेत. मात्र, सरकार गरिबांसाठी योजना आणते. पण, जमिनीच नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. घर असूनही गृहहीन अशी त्यांची अवस्था झाली आहे. अद्यापही कायद्यानुसार त्यांना जमीन हक्क मिळालेला नाही. यामुळे शिक्षण, आरोग्य, बँक कर्ज अशा अनेक मूलभूत सुविधांपासून ते वंचित आहेत.
रहिवाश्यांनी एकत्रितपणे ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासन तसेच उपसरपंच सुनील फरकडे व ग्रामपंचायत सदस्य रतन वासनिक यांच्या माध्यमातून आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत अतिक्रमित जमिनीवर स्थायी पट्टे मंजूर करण्याची मागणी केली. अतिक्रमित घरांना स्थायी पट्टे देण्याचे राज्य सरकारचे धोरण असून बल्लारपूर येथील राहिवाश्यांना नुकतेच पट्टे वाटपाची कार्यवाही करण्यात आली. याच धर्तीवर कोठारीतील अतिक्रमणधारकांना पट्टे मिळाले तर त्यांनाही शासकीय योजनांच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत.
वन व महसूल विभागाच्या जागांवरील अतिक्रमणधारक कुटुंबांना स्थायी पट्टे मिळावे, यासाठी आग्रही आहे. याबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पट्ट्याच्या कार्यवाहीची मागणी रेटून धरणार आहे. पट्टे लवकर मिळाल्यास अतिक्रमणधारकांना कायदेशीर जमीन हक्क मिळेल व त्यांच्या आयुष्यात स्थैर्य येऊ शकते. यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे.
सुनील फरकडे उपसरपंच, कोठारी