संदीप मावलिकर (संपादक / इंडियन दस्तक न्यूज)
पत्रकार / चंद्रपूर दि. २८:- चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि विदर्भातील औद्योगिक, पर्यटन व आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उचलले आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु नायडू जी यांना पत्र लिहत चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाला उडान योजनेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच चंद्रपूरहून पुणे, मुंबई आणि दिल्ली अशा प्रमुख महानगरांसाठी विमान सेवा सुरू करण्याची विनंती केली आहे.

चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक कोळसा, वीज, सिमेंट, पेपर आणि बांबू उद्योगांचा केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन, बल्लारपूर पेपर मिल, फेरो अलॉयज, धारीवाल,वर्धा पॉवर, जीएमआर प्रकल्प अशा अनेक मोठ्या औद्योगिक व ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमुळे हा जिल्हा राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा ठरला आहे. परंतु हवाई संपर्काचा अभाव असल्याने या भागातील नागरिक, उद्योजक, अधिकारी, तसेच परदेशी पर्यटक यांना नागपूर व इतर शहरांवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे वेळ, पैसा वाया जातो.

त्यामुळे चंद्रपूर शहरापासून फक्त 9 किमी अंतरावर असलेले मोरवा विमानतळ भौगोलिकदृष्ट्या अत्यंत अनुकूल आहे. सध्या येथून C90,AB 200, CJ1 ही विमाने आणि सर्व प्रकारची हेलिकॉप्टरचे उड्डाण शक्य आहे. परंतु 700 मीटर हवाई धावपट्टीचा विस्तार केल्यास प्रवासी विमानसेवा सुरू करणे शक्य होईल. तेव्हा हा प्रकल्प ‘उडान योजना’मध्ये समाविष्ट करून आवश्यक निधी व परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.

चंद्रपूर जिल्हा हा ताडोबा व्याघ्र प्रकल्प, वन पर्यटन, धार्मिक स्थळे व औद्योगिक प्रकल्पासाठी देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. अशा वेळी विमानसेवा सुरू झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला नवा वेग मिळेल, पर्यटन व गुंतवणूक वाढेल आणि नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
